साईमत न्यूज नेटवर्क –
जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, आता पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २६ ते ३० जुलै या कालावधीत जिल्ह्यात मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसासोबत ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घ्यावी ही काळजी
विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात, उंच झाडांखाली किंवा पाण्याचे साठे असलेल्या ठिकाणी थांबणे टाळावे. तसेच शेतात काम करणारे शेतकरी, गुरे चारणारे गुराखी आणि इतर नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
