नगराध्यक्षांचा बाजारपेठेत थेट संवाद स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन अस्वच्छता करणाऱ्या विक्रेत्यांना दंडाचा दणका
साईमत /चोपडा /प्रतिनिधी
शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने चोपडा नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेला अधिक गती दिली आहे. या मोहिमेला नागरिकांचा सहभाग मिळावा यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छतेची पाहणी केली तसेच प्रत्यक्ष श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला. दरम्यान, बाजार परिसरात अस्वच्छता करणाऱ्या काही विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करत प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
धनवाडी रस्त्यावरील पंकज नगर परिसरातील भाजी बाजाराला नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी अचानक भेट देऊन स्वच्छतेची स्थिती जाणून घेतली. यावेळी बाजारातील भाजी व फळ विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांनी व्यवसाय करताना स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. बाजार परिसरात कचरा साचल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छता मोहिमेदरम्यान नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी केवळ सूचना न देता स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिक आणि विक्रेत्यांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश गेला. त्यांनी प्रत्येक भाजी व फळ विक्रेत्याच्या हातगाडीची पाहणी करत ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्याच्या सूचना दिल्या.
“तुमचा व्यवसाय हा थेट शहराच्या आरोग्याशी जोडलेला आहे. त्यामुळे बाजार परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपालिकेची नव्हे, तर प्रत्येक विक्रेत्याची जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी विक्रेत्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
दरम्यान, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांबाबत नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ग्राहकांना कापडी पिशव्यांचा वापर करण्यास प्रवृत्त करावे, तसेच प्रत्येक दुकान व हातगाडीसमोर कचरापेटी ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यापुढे अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या मोहिमेदरम्यान उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, आरोग्य सभापती रमेश शिंदे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक रमाकांत ठाकूर, वंदना पाटील, सैय्यद फरमान अली, स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंके, जयेश भोंगे आदी उपस्थित होते.
नागरिकांकडून मोहिमेचे स्वागत
नगराध्यक्षा नम्रता पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेचे नागरिक आणि बाजारातील ग्राहकांनी स्वागत केले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.“नागरिकांनी शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करावे.”
