मान्सूनची दमदार एन्ट्री जळगाव जिल्ह्यात ३० जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी सुरू असतानाच आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २६ ते ३० जुलै या कालावधीत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पुढील चार-पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरणातील बदलांमुळे अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. पावसासोबतच काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांचा तीव्र कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आता पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्गासाठी हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाची आवश्यकता असतानाच अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
दरम्यान, हवामानातील बदल लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा पाण्याच्या ठिकाणी थांबणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच गुरे चारण्यासाठी बाहेर जाणाऱ्या गुराख्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले असून प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
