५० फुटांच्या तिरंग्यासह भुसावळात देशभक्तीचा महासागर ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले भुसावळ
साईमत /भुसावळ /प्रतिनिधी
कारगिल विजय दिनानिमित्त भुसावळ शहरात रविवारी देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. बियाणी एज्युकेशन ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत शहीद जवानांना आदरांजली वाहिली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी संपूर्ण शहर परिसर भारावून गेला.
कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भुसावळच्या नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ, बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ. संगीता बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी यांच्यासह रोनक बियाणी, आयुषी बियाणी, मनीष बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीमध्ये नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, पुरुषोत्तम नारखेडे, रुपेश देशमुख, सीमा नरवाडे, प्रशांत नरवाडे, प्रिती पाटील, बबलू बराटे, परीक्षित बराटे, संदीप सुरवाडे यांच्यासह बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीपूर्वी मान्यवरांच्या हस्ते शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी शहीद जवानांच्या त्यागाचे स्मरण करत राष्ट्रसेवेचा संकल्प केला.
बियाणी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी हातात तब्बल ५० फुटांचा विशाल तिरंगा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या या भव्य तिरंगा रॅलीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून रॅलीचे स्वागत केले.
रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि शहीद जवानांच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. कारगिल विजय दिनाच्या माध्यमातून नव्या पिढीमध्ये राष्ट्रनिष्ठा, देशसेवेची भावना आणि भारतीय सैनिकांच्या शौर्याची जाणीव निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.राष्ट्रगीताने या देशभक्तीपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
