अमळनेरातील मंगळग्रह सेवा संस्था शासनाच्या ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

धार्मिकतेसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाज भूषण’ पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्हासह मानपत्र असे आहे.

मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक व क्रीडामंत्री संजय बनसोडे, आ.संजय सावकारे, सचिव ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आणि सहसचिव दिलीप बहिरम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संस्थेतर्फे धार्मिकतेबरोबरच नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबविले जातात. त्यात दरवर्षी हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा, अंधश्रद्धा निर्मुलन, हुंडाबंदी, राष्ट्रप्रेम, व्यसनमुक्ती, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर विविधांगी कार्यशाळा, पर्यावरणपूरक उपक्रम आदी कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दखल घेत मंगळग्रह सेवा संस्थेला कार्यक्रमात सन्मानित केले.

पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्यासह संपूर्ण विश्‍वस्त मंडळाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here