भुसावळ–जळगाव मार्गे पंढरपूरसाठी धावणार ४ विशेष गाड्या, वारकऱ्यांना दिलासा
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून लाखो वारकऱ्यांची गर्दी होत असते. यंदाही हीच परंपरा कायम असून, वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर यात्रेसाठी एकूण चार विशेष गाड्या प्रत्येकी चार फेऱ्यांमध्ये चालविण्यात येणार असून, त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
या विशेष रेल्वे गाड्या नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर धावणार आहेत. विशेष म्हणजे भुसावळ, जळगाव आणि खान्देश परिसरातील हजारो भाविकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या गाड्यांना भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
भुसावळ–पंढरपूर या मार्गावरील प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आषाढी यात्रेसाठी पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर–मिरज विशेष गाडी (०१२०५/०१२०६) २३ व २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच गाडी २४ व २५ जुलै रोजी मिरजहून नागपूरकडे रवाना होईल. या गाडीत एसी, शयनयान आणि सामान्य श्रेणीचे डबे उपलब्ध असतील.
नवी अमरावती–पंढरपूर विशेष गाडी (०१११९/०११२०) २१ व २४ जुलै रोजी नवी अमरावतीहून दुपारी २.४० वाजता सुटून सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २२ व २५ जुलै रोजी पंढरपूरहून परत धावणार आहे. या मार्गावरही जळगावसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे निश्चित करण्यात आले आहेत.
खामगाव–पंढरपूर विशेष गाडी (०११२१/०११२२) २१ व २३ जुलै रोजी सकाळी खामगावहून सुटून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. परतीचा प्रवासही त्याच पद्धतीने होणार आहे. या गाडीमुळे विदर्भ आणि खान्देशातील भाविकांना मोठा फायदा होणार आहे.
कमी खर्चात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी (०११५९/०११६०) देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी २४ व २५ जुलै रोजी भुसावळहून सुटून पंढरपूरकडे रवाना होईल, तर परतीची सेवा २५ व २६ जुलै रोजी उपलब्ध असेल. सर्व १६ डबे अनारक्षित असणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
