साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर जळगाव तालुका पोलिसांनी गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरून काही संशयास्पद साहित्य जप्त केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन विभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले व त्यांच्या पथकाने सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बिबा नगर येथील ठिकाणावर अचानक छापा टाकला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शहरातील अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केल्याने अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.
