जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साबण, सॅनिटायझर अन् भिंग-काच घेऊन अनोखे आंदोलन; मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
नाशिक येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर तयार करून प्रशासकीय व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत आज जळगावात राजकीय वातावरण तापले. या कथित घोटाळ्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
हात स्वच्छ करण्यासाठी साबण-सॅनिटायझर आणि कारभारातील भ्रष्टाचार शोधण्यासाठी भिंग-काच हातात घेऊन आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. कुंभमेळा नियोजनातील कारभार पारदर्शक करावा आणि भ्रष्टाचाराचा डाग पुसून टाकावा, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गिरीश महाजनांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा
सदर खाते व कुंभमेळा नियोजनाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होण्यासाठी मंत्री महाजन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलकांच्या प्रमुख ३ मागण्या
उच्चस्तरीय चौकशी: बनावट टेंडर प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी.
राजीनामा: चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा.
कडक कारवाई: बनावट वर्क ऑर्डर रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.
आंदोलनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची हजेरी
या अनोख्या आंदोलनात शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख प्रमोद घुगे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, महिला महानगर प्रमुख मनिषाताई पाटील, विनायक धर्माधिकारी, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, प्रभाकर कोळी, अशोक पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, मनसेचे सुनील सोनवणे, सागर जाधव, शैलेश चौधरी, तेजस कोळी, श्रीराम पाटील, चेतन पाटील, संकेत जाधव यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
