गावठी कट्टे बाळगणाऱ्यांची आता खैर नाही;२१४ संशयितांची अचानक झडती; सात गावठी कट्टे सापडले
साईमत /जळगाव / प्रतिनिधी :
जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी मोठी कारवाई करत गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून दिली. ‘ऑपरेशन ३/२५’ अंतर्गत जिल्हाभरात एकाचवेळी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी सात गावठी कट्टे, ११ जिवंत काडतुसे, चाकू आणि तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला. याशिवाय २५ मोबाईल फोन व तीन मोटारसायकलीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख १९ हजार ६०० रुपये आहे. या कारवाईत सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांनी मागील दहा वर्षांतील शस्त्रविषयक गुन्ह्यांचा आढावा घेतला. भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या तसेच अग्निशस्त्रांच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती एकत्रित करण्यात आली. या माहितीच्या आधारे संशयितांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
गुरुवारी पहाटेच या मोहिमेला सुरुवात झाली. सकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके रवाना करण्यात आली. मागील दहा वर्षांतील शस्त्र गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या २१४ आरोपींच्या घरांची, वास्तव्याच्या ठिकाणांची आणि त्यांच्या ताब्यातील वाहनांची अचानक झडती घेण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये चांगलीच धावपळ उडाली.
शस्त्रे थेट स्वतःकडे न ठेवता ती मित्र, नातेवाईक किंवा परिचितांच्या ठिकाणी लपवून ठेवली आहेत का, याचीही पोलिसांनी तपासणी केली. उपलब्ध गुन्हेगारी माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी पडताळणी करून बेकायदेशीर शस्त्रांचा शोध घेण्यात आला. या तपासणीत सात जणांकडून शस्त्रसाठा आढळून आला.
पोलिसांच्या कारवाईत सात गावठी कट्ट्यांसह ११ जिवंत काडतुसे हाती लागली. त्याचबरोबर एक चाकू, एक तलवार, २५ मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ७ लाख १९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या हालचालींची माहिती संकलित करून त्याआधारे भविष्यातही अचानक तपासण्या आणि प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकांनी ही कारवाई यशस्वी केली.
