विहिरीत पडून कळमसरेतील शेतकऱ्याचा करुण अंत; शेतीकामासाठी निघालेल्या दीपक राजपूत यांचा मृत्यू
साईमत /अमळनेर /प्रतिनिधी
शेतीच्या कामासाठी सकाळी घराबाहेर पडलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे घडली. शेतात औषध फवारणी करण्यासाठी पाणी भरत असताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने ३१ वर्षीय दीपक दत्तूसिंग राजपूत यांचा मृत्यू झाला. या घटनेने कळमसरे गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
दीपक राजपूत हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी बैलगाडीसह शेताकडे निघाले होते. पिकांवर औषध फवारणी करण्याचे काम असल्याने त्यांना पाण्याची आवश्यकता होती. गावाच्या हद्दीतील गणपती मंदिराजवळ असलेल्या विहिरीवर ते पाणी भरण्यासाठी थांबले.
विहिरीतून बादलीच्या साहाय्याने पाणी काढण्याचे काम सुरू असताना काही बादल्या भरल्यानंतर शेवटची बादली काढताना अचानक त्यांचा पाय घसरला. क्षणार्धात तोल जाऊन ते विहिरीत पडले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या किशोर हरी मालचे यांनी तातडीने गावातील नागरिक व नातेवाईकांना कळविले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नाने दीपक राजपूत यांना विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच गावातील पदाधिकारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस पाटील व सरपंच यांनी पंचनामा केला. त्यानंतर मारवड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात दीपक राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक राजपूत यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेला तरुण मुलगा अचानक गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने कळमसरे गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजित मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.
