निर्मल पाईप कंपनीत कामावर जाताना घडली दुर्घटना; अपघातानंतर कारने घेतल्या दोन कोलांट्या
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव कारने (एमएच १९ बीएल ७०७७) दुचाकीला (एमएच १९ इसी ९०८४) जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत लीलाधर मंगल पाटील (वय ३६, रा. कठोरा, ता. जळगाव, ह.मु. चंदू अण्णानगर, जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर पाटील हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने एमआयडीसीतील निर्मल पाईप कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. इच्छादेवी चौकात राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारने रस्त्यावर दोन वेळा कोलांट्या (पलटी) घेतल्या.
जखमींवर उपचार सुरू, नातेवाईकांचा आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. लीलाधर पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती. यावेळी नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मृत लीलाधर पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. तरुण कमावत्या पुरुषाचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने कठोरा व चंदू अण्णानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्याही नोंदीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली नव्हती.
