८ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाच विल्हेवाट
साईमत -जळगाव -प्रतिनिधी |
जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ८ गुन्ह्यांमधील तब्बल १ कोटी ८६ लाख १६ हजार ४०० रुपये किमतीचा एकूण १३०.८२ किलो वजनाचा सुका गांजा पोलिसांकडून पूर्ण प्रक्रिया करून नष्ट करण्यात आला आहे. आज ६ जुलै २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार आणि पोलीस महासंचालक कार्यालयाच्या निर्देशानुसार ही कायदेशीर विल्हेवाट लावली गेली.
पर्यावरणाची हानी टाळत खड्ड्यात नष्ट केला गांजा
सर्वोच्च न्यायालयाच्या फौजदारी अपील क्र. ६५२/२०१२ मधील निर्देश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षातील जप्त साठ्याचा आढावा घेतला होता. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर हा प्रस्ताव जळगावच्या ‘अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समिती’कडे पाठवण्यात आला होता. समितीच्या मंजुरीनंतर आज जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या मागे मोठा खड्डा खणून, पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल याची दक्षता घेत हा गांजा नष्ट करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे.
ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या उपस्थितीत झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे आणि वजन मापे निरीक्षक गौतम बाविस्कर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.फौ. संजय दोरकर, पोहेकॉ. संदीप पाटील, संदीप चव्हाण, जयंत चौधरी आणि राहुल बैसाणे आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.
