शेतमजुरीसाठी निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला आयशर उलटून २५ जण जखमी
साईमत/यावल /प्रतिनिधी
यावल–फैजपूर महामार्गावरील सांगवी–हिंगोणा दरम्यान सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. शेतमजुरीसाठी निघालेल्या आदिवासी मजुरांनी भरलेल्या आयशर वाहनाचा अचानक पुढील टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाले. या दुर्घटनेत एकूण २५ मजूर जखमी झाले असून त्यापैकी १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपुडा परिसरातील कुंड्यापाणी येथील आदिवासी मजूर सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता न्हावी परिसरातील शेतात कामासाठी आयशर (क्रमांक MH 43 BB 1264) मधून प्रवास करत होते. सांगवी व हिंगोणा गावांदरम्यान वाहनाचा पुढील टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि काही क्षणातच आयशर रस्त्यावर उलटले.
अपघातात वाहनातील सर्व मजूर खाली फेकले गेले. अनेकांना हातापायांना, डोक्याला तसेच छातीला गंभीर मार लागला असून काही जण रक्तबंबाळ अवस्थेत आढळले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य सुरू करत त्यांनी जखमींना बाहेर काढून तातडीने १०८ रुग्णवाहिकांच्या मदतीने उपचारासाठी रवाना केले. सर्व जखमींना प्रथम यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
येथे यावल ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे व त्यांच्या पथकाने तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र जखमींपैकी सुमारे १५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले. उर्वरित जखमींवर यावल येथे उपचार सुरू आहेत.
या अपघातात जगन पावरा, शहनाज तडवी, आसिफ तडवी, राधा पावरा, शितल पावरा, मेहंदी पावरा, खेमा पावरा, महिमा पावरा, मंगला पावरा, अनिता पावरा, विराज पावरा, नजरुद्दीन तडवी, मीना पावरा, विरूलाल पावरा, गिरा पावरा, सुनिता पावरा, वाकी पावरा, हुरी पावरा यांच्यासह अनेक मजूर जखमी झाले आहेत. वाहनचालकाची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते.
घटनेनंतर यावल पोलीस ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व अपघाताची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात टायर फुटणे हेच अपघाताचे कारण असल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिस व स्थानिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मजुरांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
