जामदाला वाय.एन. चव्हाण महाविद्यालयाचे रासेयोचे हिवाळी शिबिर

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील जामदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर नुकतेच घेण्यात आले.

शिबिराचा समारोप राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक महारू पाटील, सुनील देशमुख, महेश चव्हाण, सोनूसिंग राजपूत, संचालिका अलका बोरसे, कर्मचारी सदस्य हरीश महाले, निमंत्रित सदस्य अनिल कोतकर, डॉ. पायल पवार, प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव, उपप्राचार्य डॉ. जी.डी.देशमुख, कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.पी. निकम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.आर.लकवाल, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. उज्ज्वला नन्नवरे, गटप्रमुख आकाश गोसावी, पूजा शिंदे उपस्थित होते.

समारोप समारंभाची सुरुवात ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थनेने व एनएसएसच्या गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांनी केला. डॉ.पायल पवार यांनी ‘मानसिक आरोग्य कसे जोपासावे’ यावर स्वयंसेवकांना उदाहरणासह सविस्तर मार्गदर्शन केले. गटप्रमुख आकाश गोसावी याने सात दिवसीय शिबिराचा गोषवारा कथन केला. यावेळी पूजा माळी, प्रवीण राठोड, संस्थेच्या संचालिका अलका बोरसे, हरीश महाले यांनीही मनोगत व्यक्त केले.

समारोप समारंभाचे अध्यक्ष डॉ.विनायक चव्हाण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव या संस्थेचे अतूट नाते आहे. संस्थेच्या प्रत्येक भरीव कार्यात राष्ट्रीय सेवा योजनेने अतिशय मोलाचे योगदान दिले. जामदा माध्यमिक विद्यालय परिसरातील पटांगण श्रमदानातून सपाटीकरण असेल, इमारतीच्या बांधकामाचे खोदकाम असेल किंवा स्वच्छता अभियान असेल त्यातून संस्थेची सेवा स्वयंसेवकांनी केली. असेच समाजोपयोगी कार्य राष्ट्रीय सेवा योजनेने पुढे सुरू ठेवावे, असे आवाहन करुन जामदा वासीयांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. स्वयंसेवकांनी जामदा गावातून ‘एक मूठ धान्य’ विषयावर पथनाट्य सादरीकरण करून ग्रामस्थांना ‘एक मूठ धान्य’ देण्याचे आव्हान केले. ग्रामस्थांनी स्वयंसेवकांना प्रतिसाद दिला. त्यामुळे १८१ किलो धान्य गोळा केले होते. ते संस्थेचे चेअरमन विनायक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करुन ते धान्य चाळीसगावातील अंध शाळेच्या मुलांसाठी देण्यात आले.

शिबिरासाठी प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी डॉ.आर.पी.निकम, डॉ.व्ही.आर.लकवाल, डॉ. उज्ज्वला नन्नवरे, आकाश गोसावी, पूजा शिंदे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन पूजा शिंदे तर आभार डॉ. उज्ज्वला नन्नवरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here