साईमत, जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात जळगाव जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात जळगाव जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांना महा आवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरूवारी, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमात महा आवास अभियान-२०२१-२२ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना महाआवास अभियान पुरस्कार व महा आवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमामुळे जळगाव जिल्ह्याने महा आवास योजना पुरस्कारात बाजी मारली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार पंकज लोखंडे यांनी भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात विशेष मेहनत घेतली. त्यांची मेहनत व सकारात्मक पाठपुराव्यामुळे मागील तीन महिन्यात जिल्ह्यातील ६६० लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.