पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करत निरोप घेतला
साईमत जळगाव प्रतिनिधी :
जिल्हा पोलीस दलात आज झालेल्या पदभार हस्तांतरण सोहळ्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिकृतपणे जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करत भावपूर्ण वातावरणात निरोप घेतला. या सोहळ्याला जळगाव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळाचा विशेष उल्लेख करण्यात आला. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, गुन्हेगारीवर घालण्यात आलेला प्रभावी वचक तसेच जनहितासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यशैलीमुळे पोलीस दलात शिस्त आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण झाल्याची भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. धिवरे यांनी पदभार स्वीकारताच विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेचा आढावा सुरू केला.
श्रीकांत धिवरे यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला मोठा फायदा होईल, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान होऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नवीन नेतृत्वाच्या आगमनाने जळगाव पोलीस दलात नवे धोरणात्मक बदल आणि अधिक कार्यक्षम प्रशासन अपेक्षित असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
