अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; रहदारीला अडथळा ठरणारे अनधिकृत व्यवसाय जमीनदोस्त
साईमत जळगाव प्रतिनिधी :
शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव महापालिकेने सुरू केलेल्या धडक मोहिमेने आज मंगळवारी (दि. २१ एप्रिल) पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठा बदल घडवून आणला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात दाखल झाले आणि अनधिकृत हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिनधास्तपणे थाटलेल्या हॉकर्सच्या गाड्या आणि टपऱ्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता. परिणामी नागरिकांना सतत कोंडीचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने अतिक्रमण थेट जमीनदोस्त केले.
या कारवाईदरम्यान महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संपूर्ण परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई पूर्ण केली. रस्त्यांवर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या अतिक्रमणधारकांमध्ये या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबवली जात आहे. अनधिकृत बांधकामे, हातगाड्या आणि टपऱ्यांवर कारवाई करून शहरातील रस्ते मोकळे करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, येत्या काळात आणखी कठोर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
