मुंबई-नागपूर हायवेवरील तरसोद-पाळधी रस्त्याची दुरावस्था | चौकशीची मागणी
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहराला वाहतूक कोंडीतून मुक्ती देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तरसोद–पाळधी बायपास महामार्गाचा दर्जा अवघ्या वर्षभरातच उघडा पडला आहे. मुसळधार पावसानंतर या बायपासवरील पुलाचे पिलर खचले असून मुख्य रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक तातडीने बंद केली आहे.
मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणाऱ्या या बायपासचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) करण्यात आले होते. पावसामुळे पिलरभोवतीची माती वाहून गेल्याने पुलाचा काही भाग उघडा पडला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या महामार्गाच्या या अवस्थेमुळे प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
शहरावर पुन्हा ताण: पाळधी गावाजवळ बॅरिकेट्स, सूचना फलक आणि मुरूम टाकून मार्ग बंद करण्यात आला आहे. सर्व वाहतूक पुन्हा जळगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरून वळवल्यामुळे शहरात भीषण वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे.
अधिकारी उत्तर देईना: या संपूर्ण प्रकाराबाबत ‘NHAI’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
सार्वजनिक निधीतून झालेल्या या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून, या कामाची तांत्रिक व निष्पक्ष सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
