लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रेरणादायी वारसा
साईमत /मुक्ताईनगर / प्रतिनिधी
शहरातील जे.ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय करून देत त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आर. पी. पाटील यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. टिळकांनी केलेले राष्ट्रजागृतीचे कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान तसेच समाजामध्ये निर्माण केलेली जनजागृती याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकमान्य टिळकांचा “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” हा विचार आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आर. व्ही. महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटासाठी आणि इयत्ता आठवी ते दहावी या मोठ्या गटासाठी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाचे आयोजन एल. व्ही. पाटील, आर. बी. महाजन व आर. पी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एल. व्ही. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
