नगराध्यक्ष गोविंद शेट अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश शेतकऱ्यांचा आवाज पोहोचला दिल्लीपर्यंत
साईमत /शेंदुर्णी / प्रतिनिधी
शेंदुर्णी व पहूर परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कापूस खरेदीसाठी स्वतंत्र केंद्राची मागणी सातत्याने लावून धरलेल्या शेंदुर्णीचे नगराध्यक्ष गोविंद शेट अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, शेंदुर्णी व पहूर येथे स्वतंत्र भारतीय कापूस महामंडळ (CCI) कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय कापूस महामंडळाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगराध्यक्ष गोविंद शेट अग्रवाल यांनी शेंदुर्णी व पहूर परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि अडचणी थेट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्यासमोर मांडल्या.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी दूरवर जावे लागू नये, तसेच योग्य दर आणि वेळेत खरेदीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शेंदुर्णी व पहूर येथे स्वतंत्र CCI कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी ठामपणे केली. शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रश्न प्रभावीपणे मांडत त्यांनी परिसरातील हजारो शेतकऱ्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे देखील प्रमुख उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक दिशा मिळावी यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे नगराध्यक्ष गोविंद शेट अग्रवाल यांनी सांगितले.
नगराध्यक्ष अग्रवाल यांनी केलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी कार्यक्रमस्थळीच संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. महाराष्ट्रात ज्या भागात ३ हजार हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते, अशा ठिकाणी नवीन CCI कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले.
त्याचबरोबर शेंदुर्णी व पहूर या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे शेंदुर्णी, पहूर आणि परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कापूस विक्रीसाठी होणारी धावपळ, वाहतूक खर्च आणि वेळेचा अपव्यय कमी होणार असून, स्थानिक पातळीवरच शेतकऱ्यांना कापूस विक्रीची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय परिसरातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून नगराध्यक्ष गोविंद शेट अग्रवाल यांच्या भूमिकेचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न थेट दिल्लीपर्यंत पोहोचवत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
