एक दिवस उलटूनही शोध नाही युवकासाठी प्रशासनाची रात्रंदिवस शोधमोहीम
साईमत /भडगाव / प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील पांढरद गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे. फुलावरून पडून बेपत्ता झालेल्या ३५ वर्षीय युवकाचा शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारपर्यंतही शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणा, प्रशासन आणि ग्रामस्थांकडून युवकाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पांढरद येथील रहिवासी प्रवीण राजेंद्र भिल (वय ३५) हे दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास फुलावरून पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
घटनेनंतर नदीपात्रासह परिसरातील विविध भागांमध्ये शोध घेतला जात आहे. मात्र, बराच वेळ उलटूनही प्रवीण भिल यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, प्रशासनाकडून सर्व शक्य प्रयत्न केले जात आहेत.
प्रवीण भिल यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातही शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांकडून प्रवीण भिल सुखरूप मिळावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शोधकार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रवीण राजेंद्र भिल यांच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठेही आढळून आल्यास तातडीने ९९७५८३३८३९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. युवकाचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
