सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; अमळनेरकरांमधून तीव्र संताप, चौकशीचे केवळ सोपस्कार की नराधम ठेकेदाराला कोठडी?
साईमत -अमळनेर- प्रतिनिधी|
शहरात जिवंतपणी माणसाला हालअपेष्टा सहन कराव्या लागतातच, पण मृत्यूनंतरही त्याच्या नशिबी अशी अवहेलना यावी, याने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. अमळनेर नगरपालिकेच्या ठेकेदाराने संवेदनशीलतेचा पार बोजवारा उडवला असून, एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह चक्क कचरा गोळा करणाऱ्या ‘घंटागाडीत’ टाकून तो अंत्यविधीसाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवी मूल्यांचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरासह तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.अमळनेर शहरात दोन दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले. मात्र, दोन दिवस उलटूनही कोणताही नातेवाईक किंवा वारसदार समोर न आल्याने, अखेर पालिका प्रशासनाने या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय राबवताना पालिकेच्या कंत्राटदाराने माणुसकीलाच काळिमा फासला.
मृतदेह सन्मानाने शववाहिनीतून (Ambulance) नेणे अपेक्षित असताना, तो थेट पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीमध्ये उघड्यावर टाकण्यात आला आणि स्मशानभूमीकडे नेण्यात आला. हा संतापजनक प्रकार काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
दैनिक साईमतचा थेट सवाल!
शववाहिनी गॅरेजमध्ये की डिझेल संपले होते?
पालिकेकडे अधिकृत शववाहिनी असताना मृतदेहासाठी घंटागाडी का वापरली गेली?
रुग्णालय प्रशासन झोपले होते का? डोळ्यादेखत मृतदेह कचरा गाडीत टाकला जात असताना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विरोध का केला नाही?
कंत्राटदाराचा परवाना तात्काळ रद्द का नाही?
या अमानुष कृत्याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घातले जात आहे का?
नगराध्यक्ष म्हणतात, चौकशी करू!
”हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि असंवेदनशील आहे. या घटनेची माहिती मिळताच मी तात्काळ सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मरणोत्तर मृतदेहाचा असा अपमान करणाऱ्या दोषींवर आणि संबंधित ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
– डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष, अमळनेर.
