अमळनेर तालुक्यात महसूल-पोलिसांची धडक कारवाई; १,४७० लिटर डिझेलसह पोकलेन, डंपर आणि बोटी जप्त
साईमत/अमळनेर/ प्रतिनिधी :
खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असताना दुसरीकडे वाळू माफियांच्या डेपोमध्ये हजारो लिटर डिझेलचा साठा आढळून आल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदी पात्रात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत तब्बल १ हजार ४७० लिटर डिझेल जप्त केले. या डिझेलची अंदाजे किंमत १ लाख ५५ हजार रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे २७ मे रोजी दुपारी महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसरात दाखल झाले. उपविभागीय दंडाधिकारी मयूर शिंगळे, तहसीलदार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळ अधिकारी कल्याणी पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.
पथकाने नदीकाठावरील परिसराची सखोल तपासणी केली असता झाडीझुडपांमध्ये तसेच डेपोच्या आडोशाला प्लास्टिकच्या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले. पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून वेगवेगळ्या ड्रममधून एकूण १,४७० लिटर डिझेल जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान घटनास्थळी उपस्थित कामगारांची चौकशी करण्यात आली. तपासात हा बेकायदेशीर डिझेल साठा अमळनेर येथील गिरीश तुलशीदास बेलदार यांचा असल्याचे निष्पन्न झाले. महसूल विभागाने हा साठा ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्यात जमा केला आहे.
विशेष म्हणजे, अमळनेर तालुक्यात सामान्य शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी कॅनमध्ये डिझेल मिळणे कठीण झाले आहे. नांगरणी, रोटर आणि इतर शेतीकामे रखडत असताना नियमांचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र दुसरीकडे वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांकडे बॅरलच्या बॅरल डिझेल सहज उपलब्ध असल्याचे या कारवाईतून उघड झाले. त्यामुळे इंधनाच्या काळाबाजाराचे मोठे जाळे तालुक्यात सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या धडक कारवाईत प्रशासनाने केवळ डिझेलच नव्हे तर १० पोकलेन मशीन, १० डंपर आणि ६ बोटी देखील जप्त केल्या आहेत. त्यामुळे अवैध वाळू उपसा प्रकरणात मोठी कारवाई मानली जात आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर डिझेल साठवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी गिरीश बेलदार यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७ व २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
