मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. १८ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम कमी व जास्त तापमानाची हेक्टरी ६० ते ७० हजार रुपये ३ आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
जानेवारी महिन्यात तापमान सलग पाच दिवस ८ डिग्री सेल्सिअसच्या कमी राहिल्याने जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळातील शेतकरी पात्र झाले आहे. त्यांना हेक्टरी २६५०० रक्कम देय आहे. एप्रिल महिन्यात तापमान सलग पाच दिवस ४२ डिग्री सेल्सिअसच्यावर राहिल्याने ४६ महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहे. त्यांना हेक्टरी ३५ हजार रुपये रक्कम देय आहे. मे महिन्यामध्ये तापमान सलग पाच दिवस ४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्याने ५० महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहे. त्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपये देय आहे. असे एकूण कमी व उच्च तापमानाचे हेक्टरी ६० ते ७० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ ऑगस्टपर्यंत जमा करणे बंधनकारक आहे.
शेतकरी बघताहेत रक्कमेची वाट
शासन प्रशासन आणि विमा कंपन्यांकडे कमी व उच्च तापमानाचा संपूर्ण डाटा मागील जवळपास आठ महिन्यांपासून उपलब्ध असल्याने कमी व उच्च तापमानाच्या नुकसानीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या आशेने शेतकरी वाट बघत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांच्या विम्याची रक्कम तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी शासनासह प्रशासनाकडे पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.