अमरावती:
”मी इतकी कमजोर नाही की राज्यसभेच्या तिकिटासाठी कोणाच्या दारावर जाईल. २०२४ मध्येही मी तिकिटासाठी कोणाच्या दारात गेले नव्हते आणि आताही गेले नाही. पदं येतील आणि जातील, पण माझी विचारधारा सोडून मी कुठेही जाणार नाही,” अशा अत्यंत स्फोटक शब्दांत अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना नवनीत राणा यांनी आपल्या आक्रमक भाषणातून पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. ही जागा मिळवण्यासाठी राणा यांनी मुंबई आणि नागपूरमध्ये भाजप व शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावरून विरोधकांनी, ‘नवनीत राणा राज्यसभेसाठी राष्ट्रवादीच्या दारात गेल्या’, अशी टीका केली होती.
विरोधकांना सडेतोड उत्तर
या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की, आमच्या विरोधात सर्व नेते एकत्र आले आहेत, तरीही रवी राणा अमरावतीमधून चौथ्यांदा आमदार झाले आहेत. राज्यसभेच्या जागेबाबत मी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. पण जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, त्यांना मला सांगायचे आहे की नवनीत राणा कधीही कोणाच्या दारात गेलेली नाही. माझे विचार शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहतील.
लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली
महायुतीच्या जागावाटपानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात होती आणि अखेर राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीने उमेदवार न दिल्यामुळे जैन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यसभेची संधी हुकली असली तरी नवनीत राणा यांनी आपण खचलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच पूर्ण कंबर कसली असून, “मी मैदानात उभी आहे आणि येणारं भविष्य आपलं आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
संसदेत जाता येत नसल्याची खंत
भाषण करताना नवनीत राणा यांनी एक खंतही बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, “मी जेव्हा खासदार होते, तेव्हा अमरावतीमधील अनेक विद्यार्थ्यांना संसदेत घेऊन जात होते. पण आता मी खासदार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे नेऊ शकत नाही, याचे मला नक्कीच दुःख आहे.” मात्र, अमरावती-नागपूर मेट्रो लवकरच सुरू होणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
