पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वाटप
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
सामाजिक समता, न्याय आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने शुक्रवारी सामाजिक न्याय दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना धनादेश, नियुक्ती आदेश तसेच गटई स्टॉलचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रास्ताविकातून समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि लाभार्थी केंद्रित योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमात अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत दोन लाभार्थ्यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. तसेच दिवंगत ऊसतोड कामगारांच्या वारसांना शासन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याचा धनादेश देण्यात आला. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी दहा लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वाटप करण्यात आले. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारांतर्गत पाच विद्यार्थ्यांना धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात राबविणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला.
