दारूसाठी पैसे मागितले नकार मिळताच पतीने चाकूने वार करून पत्नीला संपविले
साईमत /भडगाव /प्रतिनिधी
दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतवाडी तांडा येथे रविवारी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) याने पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय ३६) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. संतापाच्या भरात आत्माराम राठोड याने पत्नी ललिता यांच्यावर चाकूने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे वसंतवाडी तांडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलह वाढत असून त्यातून टोकाच्या घटना घडत असल्याने व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक समुपदेशनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने एका महिलेचा जीव गेला असून एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
