नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन साडे तेरा लाखांत फसवणूक

0
4

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

जिल्हा दूध संघ अथवा कृषी उद्योग विकास महामंडळात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन तब्बल साडे तेरा लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजकीय कनेक्शन मिरविणाऱ्या तरूणाला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथील रहिवासी फकीरा अर्जुन सावकारे (वय २५) या तरूणाने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यात नमूद केले आहे की, या तरूणाने बारावी आणि आयटीआय फिटर हा कोर्स पूर्ण केला आहे. त्यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर यांच्याशी ओळख झाली. सावदेकरांनी आपण कृषी उद्योग विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगत आपल्या खूप राजकीय ओळखी असल्याचे सांगितले. आपण तुला कृषी उद्योग विकास महामंडळ अथवा जिल्हा दूध संघात नोकरी लावून देऊ, मात्र यासाठी पैसे लागतील, असे आमिष त्यांनी दाखविले.

त्या अनुषंगाने फकीरा सावकारे यांनी प्रमोद सावदेकर याला पाच लाख रूपये रोख दिले. त्यानंतर त्याने सावकारे यांना जिल्हा दूध संघात परीक्षा देण्यास सांगितले. परीक्षा दिल्यानंतर पुन्हा पाच लाखांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी १२ डिसेंबर २०२१ रोजी त्याला पुन्हा पाच लाख रूपये दिले. ऑर्डर कन्फर्म करण्याच्या नावाखाली त्याने साडे तीन लाखांची मागणी केल्यावर त्याने पुन्हा ही रक्कम मार्च २०२२ मध्ये उकळली. त्यानंतर त्यांनी संपर्क टाळण्यास प्रारंभ केला. प्रमोद सावदेकर याने फकीरा सावकारे यांना दोन लाख रूपयांचा धनादेश दिला असता तो वटला नाही. त्यामुळे या प्रकरणात साडे तेरा लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात प्रमोद शांताराम सावदेकर (रा. जळगाव) याच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा त्याला अटक केली आहे. या व्यक्तीने राजकीय नेत्याशी असलेले संबंध दाखवून अशाच प्रकारे अनेक तरूणांना गंडविल्याची सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here