अपघातातील जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
4

साईमत, यावल : प्रतिनिधी

यावल-भुसावळ रस्त्यावरील अंजाळे गावाजवळच्या मोर नदीच्या पुलावर चारचाकी वाहनाने २ मोटरसायकलींना धडक दिल्याने झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना गेल्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली होती.जबर जखमी झालेल्या बालकावर रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी बालकाचा मृतदेह ताब्यास घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी मयत मुलाच्या नातेवाईकांची समजूत घालून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्‍वासन देऊन समजूत घातली.

सविस्तर असे की, यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळच्या मोर नदी पुलावर १ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या चारचाकीने भरधाव वेगाने वाहन चालवित दोन मोटरसायकलींना धडक दिली होती. त्यामुळे मोटारसायकलवरील मागे बसलेला सोहम शेकोकार (वय १४, रा.अंजाळे) हा भीषण अपघातात पुलावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असतांना त्याचा अखेर मृत्यू झाला.

मयत मुलाच्या कुटूंब व नातेवाईकांनी जोपर्यंत अपघातास कारणीभुत असलेल्या चारचाकी वाहन चालकाविरूद्ध मृत्यूस कारणीभुत म्हणून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. परंतु यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भुसावळ येथील रुग्णालयात भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत संबंधित चारचाकी वाहनचालकाविरूद्ध लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, असा विश्‍वास मयत मुलाच्या कुटुंबास दिला.

गतिरोधक बसविण्याची मागणी

यावल-भुसावळ रस्त्यावरील अंजाळे गावाजवळ मोर नदीचे नवीन पुलावर अंजाळे घाटातील पोलीस चौकीपासून अंजाळे गावापर्यंत रस्ता चांगला आहे. रस्त्यावर गतिरोधक नसल्याने आणि रस्त्यावर वळण असल्याने वाहने सुसाट वेगाने धावतात. याठिकाणी बरेच अपघात झाले आणि होत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही रस्त्यावर गतिरोधक तयार केलेले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही टोकावर नियमानुसार वाहनधारकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. परंतु वाहनांचा वेग कमी होईल, अशा पद्धतीने तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी यावल, भुसावळ, अंजाळे, निमगाव, राजोरा परिसरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here