राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शन
साईमत/अमळनेर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांचे अस्थिकलश दर्शन व अस्थि विसर्जन कार्यक्रम मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले. दुपारी ३ ते ४ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, अमळनेर येथे अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी नागरिक, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या जीवनकार्याला व योगदानाला श्रद्धांजली अर्पण करताना दिसले.
अस्थिकलशानंतर रथयात्रा अमळनेर, धार, मारवड, कळमसरे आणि पाडळसरे मार्गे काढण्यात आली. रथयात्रेदरम्यान मार्गावरील गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत अखेरचा निरोप दिला. संपूर्ण परिसर शोकाकुल वातावरणात न्हालेला दिसत होता.
पाडळसरे धरण येथे आमदार आणि माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. “दादांच्या स्मृती, कार्य आणि विचार सदैव आमच्या हृदयात अढळ राहतील,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
प्रदेश प्रवक्ता प्रतिभा शिंदे, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, रावेर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य समर्थक या कार्यक्रमात उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्त, शांतता आणि श्रद्धेच्या वातावरणात पार पडला.
