ढेकू-आटाळे मार्गावर भीषण दुर्घटना रिक्षा पलटीत एक महिला ठार, सहा जखमी निष्काळजी चालकावर गुन्हा दाखल
साईमत /अमळनेर/ प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील ढेकू-आटाळे मार्गावरील फरशी पुलावर झालेल्या भीषण रिक्षा अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. मजुरीचे काम करून घरी परतणाऱ्या सात मजुरांना घेऊन जाणारी पॅजो रिक्षा अचानक पलटल्याने एका महिला मजुराचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत अमळनेर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या दुर्घटनेत जिजाबाई रोहिदास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर निर्मलाबाई एकनाथ भिल्ल, रजूबाई हिरामण भिल्ल, कलमाबाई दिलीप पवार, ज्ञानेश्वर परशुराम भिल्ल, प्रमिलाबाई अजय जाधव आणि लताबाई पुंजू भिल्ल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे परिसरात दिवसभर मजुरी करून सर्व मजूर सायंकाळी पॅजो रिक्षातून ढेकूकडे परतत होते. मनोहर दिलीप चौधरी हा रिक्षा चालवत होता. ढेकू गावाजवळील फरशी पुलावर पोहोचताच वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली. अचानक झालेल्या या अपघातात रिक्षेतील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जिजाबाई पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे ढेकू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी दीपक रोहिदास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक मनोहर दिलीप चौधरी याच्याविरुद्ध बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत असून अपघातामागील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.
