वाळू माफियांवर पहाटेच्या कारवाईत सहा ट्रॅक्टर जप्त
साईमत /अमळनेर /प्रतिनिधी
तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या. हिंगोणे परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध वाळूची वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, सहा चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर अवैध वाळू व्यवसायात गुंतलेल्या घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २८ जुलै रोजी पहाटे एक ते पाच या वेळेत हिंगोणे गावालगत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला.
कारवाईदरम्यान अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे एमएच-१९-सीजे-०७७५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरसह एकूण सहा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत या वाहनांद्वारे बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याचे समोर आल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी योगेश नामदेव भोई (२५), प्रवीण रघुनाथ सोनवणे (३६), राहुल छगन ठाकरे (२०), अर्जुन अशोक माळवे (२५), सतीश मोहन बाविस्कर (३२) आणि सोमनाथ पंकज सोनार (२०) या चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जप्त ट्रॅक्टरचे मालक आणि या अवैध साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. नैसर्गिक संपत्तीची लूट रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.
दरम्यान, अवैध वाळू उत्खनन अथवा वाहतुकीबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. अमळनेर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांना मोठा आर्थिक फटका बसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
