साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेवटच्या वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ त्याच्या दारी जाऊन देण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी’ अभियानाची सुरुवात केली आहे. यामाध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी केले. ते तिरपोळे येथे आयोजित “आमदार आपल्या दारी” अभियान प्रारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, वीज महावितरण कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, अप्पर तहसीलदार भारकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, बाजार समिती सभापती कपिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य पियुष साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भारती पंडित, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, सहाय्यक गटविकास अधिकारी कैलास माळी, नायब तहसीलदार धनराळे, श्री.लाडवंजारी, वीज वितरण कंपनीचे अभियंता राऊत, तिरपोळेचे सरपंच राजू चव्हाण, बुथप्रमुख उदयसिंग राजपूत, सुनील राजपूत, गणेश सूर्यवंशी, जुलाल पाटील, माजी उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील शेखर पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शालिग्राम पाटील व शिक्षक वृंद, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, किशोर पाटील, शुभम साळुंखे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्याचे आ.मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून तिरपोळे नवेगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित ‘आमदार आपल्या दारी’ कार्यक्रमात ४३२ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच तिरपोळे येथे अश्ाा पद्धतीने ग्रामस्थांच्या दारी येऊन एकाच दिवसात योजनेचा लाभ दिला गेल्याने ग्रामस्थांनी आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले.
४५ आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या घरात पहिल्यांदा पडणार वीजेचा प्रकाश
तिरपोळे नवेगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबांना वीज कनेक्शन नसल्याने अंधारात आपले जीवन जगावे लागत होते. याबाबत काही दिवसांपूर्वीच तेथील महिलांनी आ.मंगेश चव्हाण यांची त्यांच्या चाळीसगाव येथील कार्यालयात भेट घेतली होती. त्यावेळी तुमच्या वीज कनेक्शनसह इतरही योजनांच्या बाबतीत शिबीर आयोजित करून लाभ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आ.मंगेश चव्हाण यांनी आपला दिलेला शब्द पाळत सर्व प्रशासकीय यंत्रणा सोबत घेत तिरपोळे येथे ‘आमदार आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन केले. त्यात वीज महावितरण कंपनीच्या माध्यमातून ४५ लाभार्थ्यांना नवीन वीज कनेक्शन मंजूर केले. त्यापैकी ३ लाभार्थ्यांना तात्काळ वीज मीटर देण्यात आल्याने आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या घरात पहिल्यांदा विजेचा प्रकाश पडणार आहे.
अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देणार : प्रांताधिकारी हिले
आ.मंगेश चव्हाण यांची ‘आमदार आपल्या दारी’ संकल्पना अभिनव आहे. लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट त्यांच्या गावातच एकाच ठिकाणी एकाच दिवसात लाभ मिळत असल्याने वेळेची आणि आर्थिक बचत होते. तसेच शासनाच्या विविध विभागांचा यामाध्यमातून समन्वय घडतो. प्रशासनावरील कामाचा भारही कमी होतो. अभियानाचा हा पहिलाच दिवस होता. त्यात अजून सुधारणा करून इतर गावांमध्ये व्यापक प्रमाणात हे अभियान राबविले जाईल. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी प्रमोद दिले यांनी दिली. नवीन वीज कनेक्शन ४५ पैकी ३ लाभार्थ्यांना जागेवर तसेच उर्वरित लाभार्थ्यांना ३ दिवसाच्या आत नवीन वीज कनेक्शन मिळणार आहे.
पोखरा योजनेंतर्गत ४ कोटी ९५ लाखांचे अनुदान वितरीत
तिरपोळे गावात कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजनेअंतर्गत ३४५ लाभार्थ्यांना ठिबक सिंचन, इलेक्ट्रिक मोटार, पीव्हीसी पाईप, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण, मृद व जलसंधारण कामे, शेडनेट, पॉलिहाऊस, तसेच शेडनेट, पॉलिहाऊसमधील लागवड साहित्य या सर्व बाबींकरिता ४ कोटी ९५ लाख इतक्या रक्कमेचे अनुदान कृषी विभागामार्फत संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात अदा केले आहे.