मृत नातीचा देह मांडीवर घेऊन वृद्ध आजोबा रात्रभर बसले; आरोग्य यंत्रणा व रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
चाळीसगाव तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिओ डोस आणि नियमित लसीकरण झाल्यानंतर काही मिनिटांतच अडीच महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, त्यानंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे मृत बालिकेच्या आजोबांना संपूर्ण रात्र मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन विभागाबाहेर बसून राहावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा येथे आरोग्य विभागाकडून पोलिओ व लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेला पोलिओ डोस आणि अन्य लस देण्यात आली. लसीकरणानंतर काही वेळातच बालिकेची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेने बोरसे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. सचिताचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात आयोध्या येथे कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. मुलीच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मात्र रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास विलंब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आजोबा तुळशीदास शिवदास मराठे यांना नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदन विभागाबाहेर थांबावे लागले.
पहाटे हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला. वृद्ध आजोबा मृत नातीला मांडीवर घेऊन बसल्याचे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने हालचाल करत अखेर मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला.
“रात्री शवविच्छेदन करू नका, एवढीच आमची विनंती होती. पण मृतदेह तरी व्यवस्थित ठेवायला हवा होता. रात्रभर नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन बसलो, पण कुणालाही दया आली नाही,” अशी व्यथा आजोबा तुळशीदास मराठे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी नातेवाईक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
