रेल्वे मार्ग विस्तारीकरण काम बंद पाडू; स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आ. किशोर पाटील यांचा एल्गार
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी:
तालुक्यातून जाणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गामुळे तारखेडा-गाळण नगरदेवळा परिसरातील तारखेडा बु., तारखेडा खु., चिंचखेडा गाळण (हनुमानवाडी), गाळण बु., गाळण खु., गाळण (विष्णुनगर), चुंचाळे, नगरदेवळा अशा सुमारे दहा गावांचा तालुक्याच्या गावाला जोडणारा रस्ताच बंद झाला आहे. त्यामुळे सुमारे वीस हजार नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, आगामी चार दिवसात रस्त्याचा विषय मार्गी न लागल्यास आपण रेल्वे मार्ग विस्तारीकरणाचे काम बंद पाडू, अशा इशारा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एल्गार पुकारुन आ.किशोर पाटील यांनी दिला आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाला चार दिवसात काम सुरू करण्याबाबत ‘अल्टीमेटम’ दिला आहे.
हा प्रमुख रस्ता बंद झाल्याने जनतेचा तालुक्याशी असलेला संपर्क वर्षभरापासून तुटला आहे. रेल्वे प्रशासनाने रस्ता करून देण्याबाबत वेळोवेळी आश्वस्त केलेले असतानाही रस्त्याचे कोणतेही काम झालेले नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे आ.किशोर पाटील यांनी विस्तारीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या इशाऱ्यामुळे रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे. परिसरातील शेतकरी परिसरातील नागरिकांनी आमदारांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. याबाबत खा. स्मिता वाघ यांनी याविषयी पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीकडे दुर्लक्ष
पाचोरा -तारखेडा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ३७ ची रेल्वे लगतची जमीन अधिग्रहण करून पर्यायी रस्त्याची व्यवस्था तात्काळ करण्याबाबत रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी बैठकांमधून विनंती केली. यासंदर्भात त्यांनी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. याबाबत वेळोवेळी रेल्वे प्रशासनासह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, रेल्वे व्यवस्थापक भुसावळ मंडळ, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पाचोरा यांना आ. किशोर पाटील यांच्यासह पाचोरा तारखेडा-गाळण (शिवकालीन) रस्ता संघर्ष समिती यांच्यावतीने निवेदन दिलेले आहे.
शालेय विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान
रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठकाही झाल्या आहेत. गावांच्या दळणवळणासोबत आरोग्याच्या दृष्टीने तालुक्याला पोहचण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्य सेवा वेळेत न मिळाल्याने जिवीतहानी झाल्याची कैफियत नागरिकांनी आ.किशोर पाटील यांच्यापुढे मांडली आहे. या गावांमधून बहुसंख्य मुले-मुली पाचोरा येथे शिक्षण घेण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत आहेत. हा रस्ता बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांंना त्यांचा शेतमाल पाचोरा येथे आणण्यासाठी वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने शेतकरी नाराज असल्याची स्थिती आहे.