डोंगरगाव येथे ३५ वर्षीय अविवाहित तरुणाचा मृत्यू परिसरात हळहळ, पोलिसांकडून तपास सुरू
साईमत/पाचोरा/ प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे ३५ वर्षीय अविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन बाबुलाल गुजर (वय ३५) हे डोंगरगाव येथील रहिवासी होते. ३ जून रोजी ते घरीच होते. त्यानंतर ४ जून रोजी पहाटे कुटुंबीयांच्या निदर्शनास ही घटना आली. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालय, पाचोरा येथे पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण काही वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींना सामोरे जात असल्याची चर्चा आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस सर्व शक्य त्या बाजूंनी तपास करत आहेत.
जीवन गुजर यांच्या कुटुंबावर यापूर्वीही अनेक दुःखद प्रसंग आले होते. त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे आधीच निधन झाले होते. आता कुटुंबातील एकुलता एक मुलगा गमावल्याने त्यांच्या वृद्ध आईवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
या घटनेनंतर डोंगरगाव परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी जीवन गुजर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
