साखरपुड्यानंतर महिनाभरातच मृत्यू; पाचोऱ्यात चर्चा आत्महत्या की घातपात?
साईमत/पाचोरा/ प्रतिनिधी :
पाचोरा शहरात जळगाव रोडवरील एका लॉजिंगमध्ये २५ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने बुधवारी सकाळी (दि. २८) मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, मृत्यूचे नेमके कारण आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र संजय मोरे (वय २५, रा. गिरड, ता. भडगाव) हा तरुण पाचोरा येथील जळगाव रोड परिसरातील एका लॉजिंगमध्ये आढळून आला. सकाळी सुमारे ११ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांच्याकडे देण्यात आली असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
दरम्यान, रविंद्र मोरे हे व्यवसायाने रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवत होते. “मालक मेन्स वेअर” या नावाने त्यांचे भाजी मंडई परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकान होते. शांत स्वभाव, मेहनती वृत्ती आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध यामुळे ते परिचित होते.
या घटनेला आणखी भावनिक किनार म्हणजे अवघ्या महिनाभरापूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. घरात लग्नाची तयारी आणि आनंदाचे वातावरण असतानाच अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
“तो आत्महत्या करू शकत नाही,” असा ठाम दावा नातेवाईकांनी केला असून, या मृत्यूमागे काहीतरी संशयास्पद घडले असावे, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणीही कुटुंबीयांकडून होत आहे.
रविंद्र यांच्या पश्चात वृद्ध आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांच्या निधनामुळे घराची आर्थिक व भावनिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शहरातील व्यापारी वर्ग आणि परिचितांनीही या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
पोलीस सध्या घटनास्थळावरील परिस्थिती, पुरावे आणि इतर शक्य तर्कांच्या आधारे तपास करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतरच या प्रकरणाला स्पष्ट दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
