धार्मिक यात्रेत चोपड्याच्या महिलेचा मृत्यू, शहरात हळहळ
साईमत/ चोपडा/ प्रतिनिधी
श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक समाधानाच्या शोधात निघालेल्या चारधाम यात्रेत चोपडा येथील ५९ वर्षीय प्रतिभा नारायण बोरोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात्रेच्या अंतिम टप्प्यावर असताना अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
चोपड्यातील पंकज नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रतिभा बोरोले या १६ भाविकांच्या गटासह चारधाम यात्रेसाठी रवाना झाल्या होत्या. त्यांनी यात्रेदरम्यान यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या पवित्र स्थळांचे दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चा केली होती. यात्रेच्या अंतिम टप्प्यात बद्रीनाथ येथे दर्शन घेण्याचे नियोजन होते. मात्र, दर्शनाच्या आदल्या दिवशी रात्री त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सहप्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. डोंगराळ भागातील कमी ऑक्सिजनमुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने केदारनाथ परिसरातून खाली आणण्यात आले आणि चमोली जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू करत ऑक्सिजन सपोर्ट दिला, मात्र अपेक्षित सुधारणा झाली नाही. अखेर १ मे रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
ही दुःखद वार्ता चोपड्यात पोहोचताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. धार्मिक यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेने नागरिकांना मोठा धक्का बसला असून अनेकांनी बोरोले कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, या घटनेची दखल घेत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक मदत केली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे कागदपत्रे व वैद्यकीय औपचारिकता जलदगतीने पूर्ण करण्यात आल्या. परिणामी, प्रतिभा बोरोले यांचे पार्थिव मुंबईपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक प्रशासनानेही यामध्ये सहकार्य केले.
प्रतिभा बोरोले या चोपड्याचे माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी होत्या. तसेच त्या पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वहिनी आणि उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या काकू होत. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणून त्या सर्वांना एकत्र ठेवणाऱ्या, तसेच धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने बोरोले कुटुंबासह संपूर्ण चोपडा शहरावर शोककळा पसरली आहे.
