पित्याचाच मुलांवर घाव मुलीची हत्या, मुलगा गंभीर जखमी मुलीची निर्घृण हत्या करून आरोपी जंगलात पसार पोलिसांनी घेतले ताब्यात
साईमत /अडावद, ता. चोपडा/ प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी पहाटे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका पित्याने आपल्या दोन निष्पाप मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार करत १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या अमानुष घटनेमुळे वडतीसह संपूर्ण अडावद परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुभाष गोकुळ बिलाला (वय ५०) हा आपल्या वडती येथील घराची साफसफाई व दुरुस्ती करण्यासाठी दोन मुलांसह गावात आला होता. रविवारी पहाटे घरात सर्वजण गाढ झोपेत असताना त्याने कुऱ्हाडीने आपल्या दोन मुलांवर अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात १३ वर्षीय मीरा सुभाष बिलाला हिचा जागीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय रामू सुभाष बिलाला हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनेनंतर आरोपी जंगलाच्या दिशेने पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आरोपी जंगलात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा अन्य कोणते कारण या हल्ल्यामागे आहे का, याचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीला एकूण तीन मुलगे व तीन मुली असून त्यापैकी दोन मुलगे आणि दोन मुलींचे विवाह झाले आहेत. आरोपीची पत्नी जळगाव दूध महासंघाच्या परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही घटना घडण्यापूर्वी कुटुंबातील परिस्थिती काय होती, याचाही तपास पोलीस करीत आहेत.
या अमानुष घटनेने संपूर्ण चोपडा तालुक्यासह अडावद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निष्पाप मुलांवर स्वतःच्या पित्याने केलेल्या या क्रूर हल्ल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
