सुदर्शन कॉलनीत भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास, पोलिसांचा तपास वेगात
साईमत /चोपडा / प्रतिनिधी :
शहरातील यावल रोड परिसरातील सुदर्शन कॉलनीत चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोपडा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन कॉलनीतील प्लॉट क्रमांक ३१ येथे राहणारे विजय रामकृष्ण महाजन हे दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.५० ते १०.४५ वाजेच्या दरम्यान पत्नीला क्लासला सोडण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटाचे लॉकर फोडून त्यामधील दोन लाख रुपये रोख रक्कम, १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगळ, लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या बाह्या तसेच ४० भार वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
घरात परतल्यानंतर विजय महाजन यांच्या लक्षात चोरीचा प्रकार आला. त्यांनी तत्काळ चोपडा शहर पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे सुदर्शन कॉलनी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पुढील तपास करीत आहेत.
