हस्तगत अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त, चालक फरार
साईमत -अडावद- प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील धानोरा गावाजवळील पारगाव फाट्यावर सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर अडावद पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह तब्बल तीन लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालक ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास धानोरा गावातील पारगाव फाटा परिसरात एका ट्रॅक्टरमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती अडावद पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, पोलिस येत असल्याची चाहूल मिळताच ट्रॅक्टर चालकाने वाहन जागेवरच सोडून तेथून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेतली. कारवाईमध्ये हिरव्या रंगाचा जॉन डिअर कंपनीचा ५१०७ मॉडेलचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, त्याला जोडलेली निळ्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली तसेच त्यामध्ये भरलेली सुमारे दीड ब्रास वाळू असा एकूण तीन लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय मधुकर बच्छाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद २९ जुलै रोजी दुपारी करण्यात आली असून, फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांकडून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
