साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील चामुंडा माता मंदिरासमोरील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसह दुरुस्तीसाठी महिलांसह वार्डातील नागरिकांनी नगरपरिषदेला निवेदन दिले. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेअभावी घाण पसरली आहे. त्याचा परिणामही आरोग्यावर होत आहे. यामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. महिलांच्या शौचालयाची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणीही नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून महिलांची शौचालये स्वच्छ केलेली नाहीत. याठिकाणी निधी उपलब्ध करून अन्य ठिकाणी नवीन शौचालय बांधुन द्यावी, वार्डातील मंदिरासमोरील महिलांची सार्वजनिक शौचालयाची कमीत कमी दोन वर्षापासून स्वच्छता झालेली नाही. दोन वर्षापूर्वी चाळीसगाव शहरात सातवेळा महापूर आला होता. तेव्हापासून आजतागायत महिलांची शौचालये कधीच स्वच्छ केलेली नाही. त्यामुळे शौचालयात जातांना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याठिकाणी कधी मोठमोठे साप दिसतात तर कधी वाहनांवर बसलेले व्यक्ती आत डोकावतात तर कधी अंधारात जावे लागते. त्या ठिकाणी वीजेची सोयही उपलब्ध केलेली नाही. मागील बाजूस मोठमोठे झाडे झालेले आहेत. त्या झाडांची सुकलेली लाकडे पत्र्यावर पडतात. मागील बाजूसही अस्वच्छता पसरली आहे. यासाठी आपण आपल्यामार्फत महिलांच्या सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. तसेच वार्डातील घाणीचे साम्राज्य, गटारी, रस्ते व पेव्हर ब्लॉकही चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत. अशा अस्वच्छतेच्या प्रमुख समस्या त्वरित मार्गी लावाव्यात, असे निवेदनात नमूद केले आहे.
महापुरापासून होणारे नुकसान संरक्षणासाठी मोठा व उंच धक्का बांधून देणे, त्यामुळे महापुराचे पाणी गोरगरिबांच्या घरात शिरणार नाही, त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही निवेदनात नमूद केली आहे.