२६ ते २९ जुलैदरम्यान पारायण, गुरुदीक्षा, कलश महापूजा, सत्संग व महाप्रसादाचे आयोजन देश-विदेशातून भाविकांची उपस्थिती रंगणार गुरुपौर्णिमा महोत्सव
साईमत /फैजपूर /प्रतिनिधी
वढोदे-फैजपूर येथील श्री निष्कलंक धाम, सतपंथ मंदिर संस्थानात गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, यंदाही भक्तिभाव, आध्यात्मिक वातावरण आणि धार्मिक उत्साहात महोत्सव साजरा होणार आहे. अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात आणि देश-विदेशातून हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.
शेकडो वर्षांची गुरु-शिष्य परंपरा जपणाऱ्या श्री निष्कलंक धामात दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. निसर्गरम्य परिसरात भरविण्यात येणाऱ्या या महोत्सवात भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन, सत्संग, धार्मिक विधी आणि गुरुवचनांचे श्रवण करण्याची सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे या महोत्सवाला देशाच्या विविध भागांसह परदेशातील सतपंथ संप्रदायाच्या अनुयायांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते.
महोत्सवानिमित्त दि. २६ ते २८ जुलै या कालावधीत दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘निष्कलंकी नारायण चरित्र (आगम चरित्र)’ पारायण व पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दि. २९ जुलै रोजी पहाटे ५ वाजता श्री सतपंथ मंदिरात कलश महापूजा आणि गुरुदीक्षा सोहळा संपन्न होईल.
याच दिवशी सकाळी ९ वाजता महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११ वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हजारो भाविक गुरुवचनांचे श्रवण करून आध्यात्मिक लाभ घेणार असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.
दरम्यान, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज सध्या विदेशातील सत्संग यात्रेवर असून त्यांचे दि. २८ जुलै रोजी भारतात आगमन होणार आहे. त्यांच्या आगमनानंतर गुरुपौर्णिमा महोत्सवातील प्रमुख धार्मिक कार्यक्रमांना विशेष आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होणार असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. संस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले असून, महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
