रेल्वे स्टेशन मार्ग झाला मोकळा २५ जाहिरात फलकांसह बाकडे, स्टूल व हातगाड्या जप्त; वाहतूक कोंडीला बसणार लगाम
साईमत /जळगाव / प्रतिनिधी :
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे अरुंद होत चाललेल्या रस्त्यांना अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईने काहीसा दिलासा मिळाला आहे. मनपा प्रशासकीय इमारत परिसरापासून गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग आणि खाऊ गल्ली परिसरात धडक मोहीम राबवून रस्त्याच्या जागेत ठाण मांडून बसलेले साहित्य हटविण्यात आले. या कारवाईत २५ जाहिरात फलकांसह बाकडे, स्टूल, हातगाड्या व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुकानांसमोरील जागेचा व्यावसायिक वापर वाढल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. अनेक दुकानदारांकडून दुकानातील साहित्य रस्त्यालगत ठेवले जात असल्याने वाहनांसाठी उपलब्ध जागा कमी होत होती. त्यातच रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सततची वर्दळ असल्याने गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
विशेषतः रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग आणि खाऊ गल्ली परिसरात परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. या भागात नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यात रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या, बाकडे, स्टूल आणि जाहिरात फलक लावण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी वाढत होती. त्यामुळे या भागातील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारला. पथकाने रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवून त्या ताब्यात घेतल्या. कारवाईदरम्यान सोडा-नाश्त्याच्या गाड्या, एक लोटगाडी, १७ बाकडे, १४ स्टूल आणि २५ जाहिरात फलक जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईमुळे रस्त्याच्या कडेला साहित्य ठेवणाऱ्या व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली.
कारवाईनंतर रेल्वे स्टेशन रोडसह संबंधित मार्गांवर वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध झाली. वाहनांना मार्ग काढणे सुलभ झाल्याने वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली असून, नागरिक आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग मोकळा झाल्याने गैरसोय कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केवळ कारवाई करून थांबण्यापेक्षा शहरातील प्रमुख रस्त्यांवर नियमित पाहणी करून अतिक्रमण करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. कारवाईनंतर पुन्हा रस्त्यांवर साहित्य ठेवले जाणार नाही, यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. रस्ते मोकळे राहिल्यास वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे मार्गक्रमण करता येणार आहे.
