’कृषी दिना’निमित्त जळगावात प्रगत शेतकऱ्यांचा गौरव; जिल्हा परिषद सभागृहात उत्साह
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
“जळगाव जिल्हा हा कृषी क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, सध्याच्या काळात शेतीचे उत्पादन वाढवताना जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवून कमीत कमी वापराकडे वळावे,” असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘शेतकरी सन्मान’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर, महापौर दीपमाला काळे, अतिरिक्त सीईओ रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी व कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला, तसेच बिरसा मुंडा विहीर योजनेच्या कार्यारंभ आदेशांचेही वाटप करण्यात आले.
हवामान बदलाचा फटका शेतीला बसत असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावध राहण्याचा इशारा दिला. “यंदा एल-निनोचे सावट असल्याने, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची (पाण्याची) हक्काची सोय नाही, त्यांनी किमान ८० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये,” असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात बियाणे आणि खतांचा तुटवडा नसून पुरेशा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतीमध्ये आता ‘एआय’ (AI) क्रांती; सीईओ करिश्मा नायर यांचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर दिला. “आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आता पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देत एआय आधारित तंत्रज्ञानाचा गांभीर्याने विचार करावा,” असे आवाहन त्यांनी केले. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्वप्नातील समृद्ध शेतकरी घडवण्यासाठी जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचेही नायर यांनी सांगितले.
“शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी एकच पीक घेण्याऐवजी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करा. भविष्यातील बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी शाश्वत शेती हाच एकमेव पर्याय आहे. ‘जळगाव आपलं राज्यात पहिलं’ या संकल्पनेनुसार कृषी क्षेत्रातही जिल्ह्याला महाराष्ट्रात अव्वल स्थानी नेण्यासाठी शेतकरी आणि कृषी विभागाने एकत्र येऊन काम करावे.”
— रोहन घुगे, जिल्हाधिकारी, जळगाव
