साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या जळगावच्या कन्या आणि फलटणच्या सून सौ. काजल रूतूराज भोईटे यांना मुंबईत मानाच्या ‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात त्यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ (Best Model) चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय यशामुळे जळगाव आणि फलटण शहरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सौ. काजल भोईटे यांच्या फॅशन क्षेत्रातील निष्ठा, कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या सन्मानामुळे जागतिक स्तरावर एक उदयोन्मुख मॉडेल म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली असून, मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी त्या एक उत्तम प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
’मिसेस युनिटी वर्ल्ड अर्थ’ किताबाच्या मानकरी
काजल भोईटे यांना लाभलेली ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ओळख नाही. यापूर्वीही त्यांनी जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत ‘मिसेस युनिटी वर्ल्ड अर्थ’ (Mrs. Unity World Earth) हा अत्यंत प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय किताब पटकावला आहे. त्यांच्यातील व्यावसायिकता, रॅम्पवरील कौशल्य आणि फॅशन जगतातील मोलाचे योगदान लक्षात घेऊनच त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सौ. काजल भोईटे या जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी सभापती रोहिदास मधुकर पाटील व सौ. उज्वला पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तसेच फॅशन क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
