धाडी नदीला पूर, खरीप पिके पाण्याखाली नुकसानग्रस्तांना तातडीच्या मदतीची प्रतीक्षा
साईमत /फैजपूर / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाने फैजपूर शहर व ग्रामीण भागात मोठी दाणादाण उडवली आहे. मुसळधार पावसामुळे धाडी नदीला पूर आला असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. नदीवरील लहान पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाचा जोर वाढल्याने परिसरातील ओढे, नाले आणि नदी प्रवाहित झाले आहेत. काही भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. धाडी नदी परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह वाढलेल्या ठिकाणी अनावश्यक जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर झाला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने घेतलेली खरीप पिके आता संकटात सापडली आहेत. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी यासह अन्य पिकांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांच्या मुळांना धोका निर्माण झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
आधीच वाढलेला लागवड खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अतिवृष्टीचे नवे संकट उभे राहिले आहे. पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नदी-नाल्यांच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसानग्रस्तांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
