साईमत -फैजपूर – प्रतिनिधी |
भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचा भक्तिभाव आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात आषाढी एकादशीनिमित्त अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दिंडी-पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फैजपूर येथील वै. दिगंबर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे यांचे सुपुत्र विक्रांत नारखेडे यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
जर्मनीत वास्तव्यास असलेल्या भारतीय भाविकांना एकत्र आणून हा सोहळा साकारण्यात आला असून, परदेशातील भारतीय समुदायात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
पालखी सोहळा व हरिपाठ : दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांची पालखी काढण्यात आली आहे.
सप्ताहभर धार्मिक कार्यक्रम : या सप्ताहभर चालणाऱ्या दिंडीत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी विठ्ठल नामजप, हरिपाठ, कीर्तन आणि सामूहिक प्रार्थनेचे आयोजन केले जात आहे.
युवा पिढीला वारकरी विचारांची ओळख : तेथील तरुण व विद्यार्थ्यांना वारीचे महत्त्व, पंढरपूरचे आध्यात्मिक माहात्म्य समजण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जात आहेत.
महाप्रसाद व अन्नदान : सोहळ्यादरम्यान भारतीय संस्कृती जपण्यासोबतच महाप्रसादाचे (अन्नदान) वाटप केले जात आहे.
परदेशात मराठी संस्कृती व वारकरी विचार पोहोचवणाऱ्या विक्रांत नारखेडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रज्ञा नारखेडे यांच्यासह सर्व अनिवासी भारतीय भाविकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
या उपक्रमाबद्दल वै. दिगंबर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते, गायनगंधर्व पंढरीनाथ आरू, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, मानद सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोळे, मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे, मुक्ताई मंदिर अध्यक्ष रविंद्र (भैय्या) पाटील, विश्वस्त शरद महाजन, धनंजय चौधरी, अनिल नारखेडे, भास्कर नारखेडे, सुनील नारखेडे व किरण चौधरी आदींनी विक्रांत नारखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
