दोन महिन्यानंतर शिंदखेडा शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन

0
2

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अखेर बुधवारी, ६ सप्टेंबर रोजी दिलासा मिळाला. दुपारी पावणेचार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. पावसाच्या आगमनाने सारेच सुखावले. तसेच पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.

शिंदखेडा तालुक्यात एक लाख हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड झाली आहे. हवामान अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. मात्र, जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर जवळपास दोन महिने पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यात २५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीविना राहिले आहे. महागाची बियाणे शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावले. यंदा तरी पाऊस चांगला होऊन उत्पन्न चांगले येईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ ओढ दिल्याने पीक कोरडी व्हायला लागली होती. बियाणे व पीक लागवडीचा खर्च वाया जातो की काय? अशी चिंता शेतकऱ्याला होती. पाऊस नसल्याने बाजारपेठेत आर्थिक उलाढाल जवळपास थांबली होती. पाऊस केव्हा येईल, त्याची प्रतिक्षा प्रत्येकालाच होती.

शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

ऑगस्टच्या अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल, असा अंदाज अनेक हवामान तज्ज्ञ व्यक्त करत होते. पण दिवसांनी वाढणारा उन्हाचा तडाखा काळजी अधिकच वाढवित होता. आज नाहीतर उद्या तरी पाऊस येईल, अशा आशेवर शेतकरी, व्यावसायिक जगत होते. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती व भीषण पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जलसाठे कोरडेठाक झाले होते. शासनातर्फे पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. शहरासह शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना बुधवारी दुपारी अखेर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही प्रमाणात कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद अशा पिकांना जीवदान मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here