अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन जणांना सुरतला अटक

0
26

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या संशयित आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला शहर पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले होते.

सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ ऑगस्ट रोजी तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पीडित मुलीला शुभम संजय मोरे (रा. चाळीसगाव) याने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित शुभम मोरे याचा मित्र राहुल जगन सुतार (रा. सुरत) याच्या मदतीने पीडित मुलीला मोरे याने पळवून नेल्याचे समोर आले. त्यानुसार शहर पोलिसांनी राहूल सुतार याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने माहिती दिली. पीडित मुलीला शुभम मोरे याने सुरत येथे नेवून तिथे भाड्याच्या खोली राहण्यास सहकार्य केले. दरम्यान, पोलिसांनी सुरत येथून संशयित आरोपी शुभम मोरे आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्ह्यात पोक्सोचा कलम वाढविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, पो.कॉ. आशुतोष सोनवणे, रवींद्र वच्छे, उज्ज्वल म्हरके यांनी केली.

पालकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांतर्फे आवाहन

अल्पवयीन मुलींबाबत कोणतीही तक्रार असल्यास पालकांनी न घाबरता तात्काळ पोलीस स्टेशनला येवून माहिती द्यावी. जेणेकरुन गुन्ह्यांना तात्काळ पायबंद घालता येईल. तसेच युवकांमध्ये मोबाईलच्या सहाय्याने सोशल मीडिया वापराचे प्रमाण वाढलेले आहे. पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांचे मोबाईल तपासून मुले कोणाच्या संपर्कात आहेत काय? याबाबत नेहमी सतर्क राहण्याबाबत पोलीस प्रशासनाच्यावतीने आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here